Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊतांचा हल्लाबोल
महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण गरजेचं असल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं, त्यावरून राऊतांनी हे टीकास्त्र सोडलं
लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी घराघरांत दारू पोहोचवा असं एक नवं व्हिजन (सरकारचं) दिसतंय. म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे, दारूडे निर्माण करायचे , अशी पैसे कमावण्याची योजना दिसते आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला. लाडकी बहिण योजना तसेच 2 लाख कोटीची तूट भरुन काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण गरजेचं असल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं, त्यावरून राऊतांनी हे टीकास्त्र सोडलं .
दारूची दुकानं वाढवणार आहेत. ड्राय डे कमी करणार आहेत. शॉप आणि मॉलमधून दारू विकण्याचं प्रपोजल आलं आहे. काही राज्यात घरपोच दारू पोहोचवण्याची स्किम आणण्याचं चाललं आहे. पूर्ण राज्याला दारूडे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप करतानाच हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार असल्याची टीकाही राऊत यांनी केली. महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांसारखा असा विचार करत असेल तर ते राज्याचं दुर्दैव आहे, असा निशाणाही राऊतांनी साधला.