Sanjay Raut Press Conference : भाजपमधील बाटगे नवहिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला खतपाणी घालताय; राऊतांची टीका

| Updated on: Mar 23, 2025 | 11:24 AM

Sanjay Raut News : उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर नागपूर हिंसाचार, औरंगजेब कबर आणि हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून पत्रकारांशी बोलताना टीका केली.

औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे. त्या थडग्यावरून महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्यात आला. नागपूरची निवड त्या राड्यासाठी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची निवड कोणी केली का? असा प्रश्न उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. हिंदुत्ववाद, नागपूर राडा आणि औरंगजेब कबर या मुद्यांवरून राऊत यांनी आज भाजपवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपमधील बाटगे नवहिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करून ठेवल्या आहेत.हा राज्याला धोका आहे. औरंगजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरुंगात डांबले किंवा खतम केले. लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना ‘कैद’ झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही. औरंगजेबाचे थडगे हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे. तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत. थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खानी जिवंत केला. तो त्यांच्याच मानगुटीवर बसला, असंही राऊत यांनी यावेळी म्हंटलं आहे.

यावेळी नागपूर राडा प्रकरणी बोलताना राऊत म्हणाले की, चारशे वर्षांपूर्वी कबरीत गेलेल्या आलमगीर औरंगजेबावरून महाराष्ट्रात राडा झाला. राड्याचा केंद्रबिंदू नागपूर आहे हे विशेष. राज्यकर्तेच असा हिंसाचार घडवतात हे खरे, पण आपल्याच  मतदारसंघात, आसपास राडा नको असतो. त्यामुळे नागपूरच्या राड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका आहे हे मानायला मी तयार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Mar 23, 2025 11:24 AM
Narayan Rane Video : ‘त्याला सांगा हे बरं नाही, तो जिथं जातो तिथं…’, त्यावेळी राणेंनी ठाकरेंना काय दिला होता सल्ला?
Satish Bhosale : खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली