..तर ओबीसी समाज सरकारला जगू देणार नाही, काय म्हणाले तायवाडे
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचे आश्वासन वेळोवेळी सरकारने दिले आहे. आमचा अजूनही सरकारवर विश्वास आहे. परंतू ज्यावेळी हा विश्वास ढळणारे कृत्य घडेल त्यावेळी ओबीसी समाज मराठ्यापेक्षा मोठे आंदोलन उभारेल असा इशारा ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. सध्या आपण मुंबईत आंदोलन करणार नसून जिल्हा पातळीवर आपला संघर्ष सुरु ठेवत 'वेट एण्ड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे तायवाडे यांनी म्हटले आहे.
जालना | 29 डिसेंबर 2023 : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्याचं प्रमाणपत्र देऊन सुद्धा त्यांचे ओबीसीकरण करणार नाही असे लेखी आश्वासन 29 सप्टेंबरला सरकारने दिले होते. आता तीन महिन्यात सरकारने आपला शब्द बदलेला नाही. तरी ओबीसी समाज ‘वेट एण्ड वॉच’च्या भूमिकेत असून ज्यावेळी साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला दिलेला शब्द सरकार आंदोलनाच्या दबावाखाली येऊन फिरवेल त्यावेळी ओबीसी समाज सरकारला जगू देणार नाही असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असल्या तरी त्याच्या पत्नीकडील सग्यासोयऱ्यांना हे आरक्षण लागू होत नाही हे सरकारने स्पष्ट केलेले आहे. आम्हाला सरकारकडून काही अन्याय होईल असे आता तरी वाटत नाही. जर असा अन्याय झाला तरच आम्ही मोठे आंदोलन उभारु असेही बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.