Special Report | ‘महाविकास आघाडीमुळं बाळासाहेब आनंदीत असते’!-TV9
बाळासाहेब असते तर त्यांनाही महाविकास आघाडीचं सरकार पाहून आनंद झाला असता, असं त्यांचेच नातू आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या मैत्रीवर बोलताना, आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय.
बाळासाहेब असते तर त्यांनाही महाविकास आघाडीचं सरकार पाहून आनंद झाला असता, असं त्यांचेच नातू आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या मैत्रीवर बोलताना, आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांच्या महाविकास आघाडी स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच भाजपनं हल्ले सुरु आहेत. आणि आता बाळासाहेब असते तर त्यांनाही आनंद झाला असता, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी करताच भाजप नेते चांगलेच संतापले. मुंबई विद्यापाठीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरलंय…या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात, शरद पवारांनीही बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. दोघांचे वेगळे पक्ष असले तरी, बाळासाहेबांची शिवाजी पार्कातली पहिली सभा कशी ऐकली याचा किस्साही पवारांनी सांगितला.
एकमेकांवर टोकाची टीका करायचो..पण सभा झाल्यानंतर रात्रीचं जेवण बाळासाहेबांच्याच घरी असायचं, ती आठवणही पवारांनी सार्वजनिक केली. बाळासाहेब जसे उत्तम वक्ते होते…तितकेच ते व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते…त्यांच्या व्यगंचित्रातून राजकीय फटकारे पवारांनाही बसलेत..स्वत: पवारही तो अनुभव विनोदी शैलीत सांगतात. नातू आणि आजोबा म्हणून दोघांमधलं नातं कसं होतं, हे आदित्य ठाकरेंनी काही आठवणींमधून सांगितलंय. मुंबई विद्यापाठातील फोटो प्रदर्शनी म्हणजे बाळासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचा संग्रहच आहे…यात सभा, राजकीय व्यक्तींपासून सेलिब्रिटी ते मायकल जॅक्सनही आपल्याला दिसतील.