सदावर्ते यांच्या ताब्यात गेल्यानंतर एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल आल्यानंतर त्यांच्या कारभाराने बँकेची परिस्थिती खालावली आहे. या संदर्भात आता एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आंदोलन पुकारणार आहेत.
एसटी कामगारांच्या हक्काची आणि जिव्हाळ्याची बँक असलेल्या एसटी कर्मचारी बँकेत एड.गुणरत्न सदावर्ते यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी या बँकेचे अक्षरश: वाटोळे केले आहे. कामगारांनी कामगारांच्या हितासाठी चालविलेल्या या बँकेत एसटीच्या कर्मचाऱ्यांना आता कर्ज मिळणे बंद झालेले आहे. कामगारांच्या मुलांची लग्नं आहेत औषधे-पाण्याचा खर्च आहे. परंतू कोट्यवधीचा घोटाळा या संचालक मंडळाने केला आहे. यासंदर्भात सहकार आयुक्त कार्यालयावर कृती समितीच्या वतीने आम्ही आंदोलन केले होते. सहकार आयुक्तांनी शहाजी पाटील यांची उच्च स्तरिय समिती नेमली होती.शहाजी पाटील यांच्या कमिटीने सर्व अहवाल निगेटिव्ह दिलेले असताना अजूनही संचालक मंडळावर कारवाई होत नाही असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, केवळ बरखास्तीची कारवाई होऊ नये तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही येत्या 27 तारखेला पुण्याच्या सहकार आयुक्तांच्या कार्यालयावर आम्ही धडक मोर्चाचे आयोजन केले आहे असे एसटीची एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटले आहे.