सरकारला झुकवलं, मनोज जरांगे पाटील यांचा पुढचा ‘गेम प्लॅन’ काय? 31 व्या दिवसानंतर सरकारची पुन्हा कसोटी
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 15 दिवस झाले. लाठीचार्जमुळं आंदोलन आणखी बळकट झालं. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, उदयनराजे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री भुमरे, प्रकाश आंबेडकर असे अनेक नेते आले. सरकारचे 2-2 जीआर जरांगे पाटलांनी फेटाळले.
संजय सरोदे / दत्ता कनावटे, अंतरवाली सराटी : 12 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषणाच्या 15 व्या दिवशी 2 पावलं मागे घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनुसार त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला एका महिन्याचा अवधी दिला. पण, 31 व्या दिवशी कुणबीचे दाखले द्या, अशी मागणी कायम ठेवली आहे. त्यासाठी हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. उपोषण मागे घेण्याची घोषणा करतानाच जरांगे पाटील यांनी महत्वाच्या 3 अटी सरकारसमोर ठेवल्या आहेत. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांचा महिन्याभरात अहवाल कसाही आला तरी 31 व्या दिवशी कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करा असं जरांगे पाटील म्हणालेत. तर, उपोषण सोडायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यासह दोन्ही राजेंनी यावं अशी दुसरी अट त्यांनी घातली आहे. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि अधिकारी निलंबित करा अशी त्यांची तिसरी अट आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला झुकवलंच. पण, आहे तिथेच पुढचे 30 दिवस आंदोलन करणार आहेत. त्यामुळे 31 व्या दिवसापासून सरकारची पुन्हा कसोटी सुरु होईल.