‘बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष तुम्ही संपवून टाकला, तुमची लायकी आहे का?’ भाजप नेच्याचा ठाकरे यांच्यावर पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे.
मुंबई : वरळीत आयोजित शिवसेनेच्या पदाधिकारी शिबिरात उद्धव ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे. त्यांनी ‘उद्धवजी, तुम्ही हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली दिलीत. त्यांनी स्थापन केलेली शिवसेना स्वतःच्या मुख्यमंत्रिपदासाठी उध्वस्त केली. तुमच्याच नाकर्तेपणामुळे आजही लोक तुमचा पक्ष सोडून जात आहेत. आणि आता तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नावाने खडे फोडत आहात. मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? आमची बावनकुळं ही विचारांचे पाईक राहिलेले कुळं आहेत. तुमच्यासारखं खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारं हे कुळ नाही. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, ही देवेंद्र फडणवीस यांची नाही तर तुमची अवस्था आहे असा घणाघात बावनकुळे यांनी केला. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धवजी तुम्ही संपवून टाकला. वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं असा पलटवार देखील बावनकुळे यांनी केला आहे.