“रावणी वृत्ती, रावणी अत्याचारामुळे कार्यकर्ते नाराज”; भाजप नेत्याची राजू शेट्टी यांच्यावर टीका
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नाराजी नाट्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नाराजी नाट्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “पक्ष आणि संघटना फोडण्याचं अधिकृत काम भाजपचं आहे. स्वाभिमानी संघटनेत जे घडतंय यामागे सुद्धा भाजप असल्याचा संशय आहे. कारण भाजपकडून त्यांना ऑफर दिली जाते, निश्चितच संशयाला जागा आहे,” असं राजू शेट्टी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पक्षाच्या विचारामध्ये कार्यकर्त्यांची श्रद्धा नसेल, तर माणसं फुटणार. रावणाची बाजू कच्ची होती म्हणून बिभिषण फुटले याचा दोष तुम्ही प्रभू रामाला देणार का? बिभिषण जे रामाच्या बाजूने गेले तर प्रभू राम कसे दोषी असणार ? रावणी वृत्ती, रावनी अत्याचार हा त्याला कारणीभूत होता. तुम्ही जर आपल्या कार्यकर्त्यांशी सन्मानाने वागला नाहीत, तुम्ही तुमच्या विचारांवर आधारित राजकारण न करता सत्तांधाने सत्तेचा राजकारण करणार तर मग हे असे प्रश्न उपस्थित होतात.भाजपला यात दोष देण्याचा कारण नाही.”