Maharashtra power struggle : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आलाच नाही तर…; उज्ज्वल निकम यांनी काय वर्तवली शक्यता
संपूर्ण देशाला हा निकाल काय लागणार याची उत्सुकता आहे. अशात कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची माहिती दिली.
मुंबई : सर्वोच्च न्यायालायत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. नऊ महिन्यांच्या युक्तिवादानंतर आता या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. तशा चर्चाही रंगल्या आहेत. संपूर्ण देशाला हा निकाल काय लागणार याची उत्सुकता आहे. अशात कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल, हे आत्ता जरी सांगणे कठीण असले, तरी माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायाधीश निवृत्त होत असल्याने हा सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटात आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. याचबरोबर त्यांनी जर निकाल आलाच नाही तर नवे न्यायाधिशांचा या सुनावणीत समावेश होईल त्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होईल असं सांगितलं आहे. त्यांच्या या शक्यतेमुळे शिंदे गटास काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.