राहुल गांधींच्या अपात्रतेविरोधात काँग्रेसचं सत्याग्रह
देशाची राजधानी दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधीवर काँग्रेसतर्फे आज सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
नवी दिल्ली/ मुंबई : गुजरातमधील सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेसाठी अपात्र ठरवल्यानंतर राजकारण तापले आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस आज सर्व राज्य आणि जिल्हा मुख्यालयात महात्मा गांधी पुतळ्यांसमोर सत्याग्रह करणार आहे. देशाची राजधानी दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या समाधीवर काँग्रेसतर्फे आज सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
तर राज्यातही मोठ्या प्रमाणात काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यातही काँग्रेसने मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आज देशातील सर्व राज्यांमध्ये पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सत्याग्रह आंदोलन करत आहेत.