आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, सोन्याच्या चमचा…
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसेच ठाण्यातून आपण लढणार आणि जिंकून ही दाखवणार असे म्हटलं होतं
ठाणे : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला मारहाण झाल्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या मारहाणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटासह मविआच्या नेत्यांनी निषेध मोर्चा काढला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसेच ठाण्यातून आपण लढणार आणि जिंकून ही दाखवणार असे म्हटलं होतं. त्यावर शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्यांनी, लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायच्या अधिकार आहे. मात्र जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. तर आदित्य ठाकरेंवर टीका करताना, बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. शिवसेना उभी करण्यात माझ्यासारखे लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आहे. घरा दारावर आम्ही तुळशी पत्रक ठेवलं. त्यामुळे सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्यांवर मी काय बोलणार असा टोला त्यांनी लगावला आहे.