ठाणे आणि कल्याणचे सुभेदार कोण ? महायुतीने घेतला हा निर्णय
कल्याण आणि ठाणे मतदार संघातून कोणाच्या वाट्याला येणार यावरुन महायुतीत धुसफूस सुरु होती. परंतू आता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर खलबतं झाली असून या जागांवरील सस्पेन्स संपला आहे.
मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकांचे अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरुच आहे. ठाणे, कल्याण, सातारा, सिंधुदुर्ग, संभाजीनगर आणि नाशिक जागेवरुन महाआघाडीत हमरीतुमरी सुरु आहे. आता ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स संपल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता एक दोन दिवसात शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपाने कल्याण आणि ठाणे मतदार संघावर दावा केला होता. परंतू आता शिवसेनेचा बालेकिल्ला एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात राहीला आहे. शनिवारी रात्री ‘वर्षा’वरील बैठकीत ठाणे आणि कल्याण लोकसभा जागा शिवसेनेलाच देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता डॉ. श्रीकांत शिंदे यांचा कल्याण मतदार संघातून उभे रहाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे म्हटले जात आहे. ठाणे मतदार संघातून आता कोणाला उभे करणार हे सुद्धा काही दिवसात कळणार आहे.