लाडकी बहिण कोणाची ? महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजनेवरुन विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.ही योजना आपल्यामुळेच चालू झाली असे तीनही घटक पक्ष सांगत आहेत. आणि एकमेकांना पोस्टरवरुन टाळत आहेत.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहे. मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजनेची घोषणा अर्थ संकल्पात करण्यात आलो होती. 1 जुलैपासून ही योजना महाराष्ट्रात लागू झाली आहे. वर्षभरात 18,000 हजार पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेत चार हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आधी योजनेसाठी 30 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. नंतर या योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत तारीख वाढविण्यात आली. आता 2 कोटी 30 लाख महिलांनी अर्ज केला आहे. या योजनेचे श्रेय घेण्याची महायुतीतील घटकपक्षात चढाओढ सुरु आहे. वृत्तपत्रात जाहीरात करताना योजनेच्या नावातून भाजपाने ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शब्द वगळून या योजनेचे पोस्टर व्यासपीठावर लावत महिलांचे मेळावे घेतले. नंतर टीका झाल्याने पुन्हा ‘मुख्यमंत्री’ हा शब्द समाविष्ट केला. जळगावात भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या लावलेल्या पोस्टरमध्ये लाडकी बहिणीचे श्रेय घेताना मुख्यमंत्री शब्द वगळला आहे. तर पोस्टरवरुन अजित पवार यांचे छायाचित्र वगळले आहे.तसेच कॉंग्रेसच्या राज्यात कर्नाटक, झारखंड येथे ही योजना जाहीर करुन नंतर बंद केल्याचा आरोप महायुतीने केला असून त्याला महाविकास आघाडीने जोरदार उत्तर दिले आहे.