शरद पवार यांच्यावरून भाजपचा अजित पवार गटाला थेट इशाराच; म्हणाले, ‘विठ्ठल म्हणणं थांबवा’
त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांच्यासह शरद पवार गटाकडून मेळावे घेण्यात आले. यावेळी शरद पवार यांचा दोन्ही गटाकडून विठ्ठल असा उल्लेख करण्यात येत आहे.
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार घेत बंड केलं. त्याचबरोबर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांच्यासह शरद पवार गटाकडून मेळावे घेण्यात आले. यावेळी शरद पवार यांचा दोन्ही गटाकडून विठ्ठल असा उल्लेख करण्यात येत आहे. त्यावरून आता भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. त्यांनी शरद पवार यांना विठ्ठल म्हणणं तात्काळ थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला आहे. यावेळी भोसले यांनी, जगाचा मालक असलेल्या आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणे शोभते का? म्हणून हे तात्काळ थांबवा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलने करावी लागतील. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? थोडी तरी लाज बाळगा आणि हे तात्काळ थांबवा, असे भोसले यांनी म्हटलं आहे.