लालबागच्या राजावर 260 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, भाविकांची रांग, सकाळी सहा वाजता दर्शनाला सुरवात
लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी संध्याकाळपासूनच रांग लावली आहे. बाप्पाच्या दर्शनाची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर, संध्याकाळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लालबागच्या राजा येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | जगभरात नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाच्या सुरक्षेची तयारी पर्ण झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लालबागच्या राजा मंडळांला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सर्व गणेश मंडळांना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गणेश भक्तांनी उत्सवाचा आनंद घ्यावा, तसेच सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी केले. मुंबईकरांना सुरक्षेची चिंता करण्याचे काही कारण नाही. प्रमुख मंडळामध्ये खूप गर्दी होत असते. मात्र, प्रमुख मंडळासहित सर्व मंडळाची सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी करोडो भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन सकाळी सहा वाजता सुरु करणार आहोत असे सांगितले. आयुक्तांनी सुचवलेल्या गोष्टीत बदल करू. आमचे राजाचे 5 ते 6 हजार पुरुष आणि महिला सुरक्षा रक्षक भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज आहोत. २६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून आम्ही सर्वावर नजर ठेऊन आहोत. प्रत्येक भविकाला सुलभ दर्शन घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सुधीर साळवी यांनी सांगितले.