शिवाईनगर शाखा वाद; ठाकरे गटाच्या 50 खोकेच्या घोषणेला शाखा आमचीच असं उत्तर
शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी, शिवसेना नाव आणि चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे ही शाखा आमचीच असा दावा केला.
ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा शाखेचा वाद ऐरणीवर आला आहे. होळीच्या पुर्वसंधेला ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. ठाण्यातील शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. यावेळी शिवसेनेने ही शाखा बळजबरीने बळकवल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून शाखेच्या बाहेर 50 खोकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर शिवाईवरून वातावरण तंग झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जात कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुलूप तोडून कसली दादागिरी केली जात आहे असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यावर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी, शिवसेना नाव आणि चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे ही शाखा आमचीच असा दावा केला. त्यानंतर आता शिवाईनगर शिवसेना शाखेच्या बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.