प्रदुषण रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा क्रांतीकारी निर्णय, लालपरी एलएनजीवर धावणार

| Updated on: Mar 15, 2024 | 2:27 PM

एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील पाच हजार गाड्यांना एलएनजी किट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी बसचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार आहे. एलएनजीच्या काही बसेस आज मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या आगारात दाखल झाल्या त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहीती दिली.

Follow us on

मुंबई | 15 मार्च 2024 : एसटी महामंडळाने बदलत्या काळानुरुप आपल्या ताफ्यात आता एलएनजी इंधनावरील बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण पाच गाड्या डीझेलवरुन एलएनजी इंधनावर ( लिक्वीफाईड नॅचरल गॅस ) परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटी महामंडळाची 240 ते 250 कोटी रुपयांची डीझेल बचत होणार आहे. या गाड्यांमध्ये एसटीबसेसच्या आत याचे ब्लोअर बसविण्यात आल्याने प्रवाशांना देखील हवा खेळती राहून एसी गाडीचा फिल येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या गाड्यांना साध्या एसटी सारखाच दर असणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ग्लोबल वार्मिंग आणि क्लायमेंट चेंज या प्रदुषणाच्या समस्येवर उतारा मिळविण्यासाठी क्रांतीकारी पावले टाकली असल्याचे म्हटले जात आहे. अलिकडे एसटीने पाच हजार इलेक्ट्रीक गाड्या आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे टेंडर काढले होते. आता आणखी पाच हजार गाड्या जैव इंधनावर ( एलएनजी ) चालविण्याचा निर्णय घेतल्याने महामंडळासह प्रवाशांना देखील फायदा होणार आहे.