“अशा दुर्घटना रोखण्यासाठी सर्व राजकारण्यांनी एकत्र यावं”, उद्धव ठाकरे यांचं आवाहन
इर्शाळवाडी दरडग्रस्तांना उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे. "या दुर्घटना रोखण्यासाठी सर्व राजकारण्यांनी एकत्र यावं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
रायगड, 22 जुलै 2023 | इर्शाळवाडी गावात उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दरवर्षी अशा घटना होतात, आपण तेव्हा जागे होतो आणि कालांतराने हे विषय थंड होतात. ही दुर्दैवाची बाब आहे. मी यात राजकारण करत नाही, पण राजकारणी म्हणून सर्वांनाच लाजीरवाणी गोष्ट आहे. आज देखील महाराष्ट्रात दरडग्रस्त अशा अनेक वस्त्या आहेत. माझं मत हेच आहे की, सर्वच पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे. सरकार कुणाचंही येओ पण अशा योजनांना स्थगिती देता कामा नये इतकी माणुसकी आपण ठेवली पाहिजे. तळियेला मी जाणार आहे तिथलाही आढावा घेणार आहे. आपण राजकारणी म्हणून जेव्हा मतं मागायला जातो तेव्हा लाज वाटली पाहिजे”