Udhav Thackeray : हिंदुत्व सोडल्याची घोषणा भाजपने करावी; ‘सौगात ए मोदी’वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
Udhav Thackeray Press Conference : शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला.
भाजपने एकदा घोषणा करावी की त्यांनी हिंदुत्व सोडलंय. त्यांनी इतकी वर्ष हिंदू मुस्लिम भांडणं लावली. काही लोकांचा जीव गेला. त्यांनी आता जाहीर करावं की त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, अशी टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रामजान ईदनिमित्त भाजपकडून सौगात ए मोदी या किटचं वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी यावरून भाजप सरकारवर टीका केली.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आता हनुमान जयंती आणि राम नवमी येणार आहे. जसा अल्पसंख्याक सेल आहे. तसा भाजपचा अल्पसंख्याक सेल आहे का? त्यांच्या बॅटरीत काही पॉवर आहे का? बैसाखी आणि इस्टरलाही वाटणार आहे. ईदच्या निमित्ताने भेट देतात ही चांगली गोष्ट आहे. भाजपच्या पैशातून ही भेट जात आहे. पण हिंदुंना घंटा वाजवायला लावली जाते. त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग ज्यांच्याकडून दंगल करायला लावायची त्यांचे जीव जातात. घरे जाळली जातात. त्यांच्यावर कारवाई होते आणि हे मात्र सत्तेसाठी सर्वांच्या गळाभेटी घेतात. दिल्लीची निवडणूक झाली. तिथे बऱ्याच वर्षाने भाजपची सत्ता आली. तिथल्या मुख्यमंत्र्यानेही इफ्तार पार्टी केली. म्हणजे ही सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. सत्तेसाठी हे काहीही करत आहेत, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली आहे.