औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर दंगली का घडवल्या? राऊतांचा खोचक प्रश्न
Sanjay Raut on Amit Shah : छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात रायगडावर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख समाधी असा केल्याने आता विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
शिवबांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या गृहमंत्री शहांवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात तुम्ही कार्यक्रम करता आहे. मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही छत्रपतींच्या गाद्या असताना त्यांना आमंत्रण का दिलं नाही? उदयन राजे भोसले भाजपमध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचं. छत्रपती शिवाजी महाराज भाजपमध्ये नव्हते, अशी टीका देखील यावेळी राऊत यांनी केली आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला जर औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर इतक्या हाणामारी आणि दंगली का घडवल्या? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाजूला बसलेले असताना केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूच्या थडग्याला समाधीच्या दर्जा देण्यासंदर्भात वक्तव्य करतात, त्यांच्या वंशजांना या गोष्टीचा त्रास व्हायला हवा होता. पण ते गुजराती आहे म्हणून त्यांना सर्व काही माफ आहे का? असा खोचक प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे.