अवकाळीने रोजीरोटी हिरावली, विटांचा झाली माती; लाखोंचे नुकसान
नागपूर जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीसह घरांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचे पंचनामे लवकर करून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
नागपूर : निर्सगाच्या लहरीपणामुळे राज्यातील अनेत जिल्ह्यांना अवकाळी पाऊसने झोडपले. अनेक ठिकाणी झालेल्या अवकळी पाऊस आणि गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला आहे. तर अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली. तर काही ठिकाणी जीवतहानी देखील झाल्याचे समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीसह घरांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचे पंचनामे लवकर करून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. यादरम्यान नागपुरात झालेल्या सततच्या पावसामुळे विट भट्ट्यांना मोठा फटका बसला आहे. नागपूरातील पुनापूर, पारडी भागात 50 ते 60 वीटभट्ट्या आहेत. येथे गेल्या तीन चार दिवसांतल्या सततच्या पावसामुळे कच्च्या विटांची माती झाल्याचे समोर येत आहे. तर यामुळे सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले आहे. तर विटभट्ट्यांवर 150 मजूर काम करतात, सततच्या पावसामुळे मुजरांचाही रोजगार बुडाला आहे. पाणी विटभट्टीत शिरल्याने कच्च्या विटा आणि मातीही वाहून गेल्याने त्याची नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी होत आहे.