बळीराजाची अवकाळीपासून कधी होणार सुटका; गडचिरोलीची चिंता वाढवणारी बातमी
जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळल्याने उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अवकाळीसह बऱ्याच जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा देखील बसला असून रब्बी हंगामातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान, एकीकडे बळीराजा अवकाळीपासून नेमकी कधी सुटका होईल, याची वाट पाहत असतानाच आता गडचिरोलीची चिंता वाढवणारी बातमी आहे. काही दिवसांपुर्वीच हवामान विभागाने वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेपासूनच अवकाळीला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळल्याने उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तर या पावसामुळे जिल्ह्यातील शेत शिवारातील धान पिकांचं मोठं नुकसान झाल आहे.