Video: ‘राजसाहेब का बाल भी बाका होएगा ना तो..’ Viral call Recording मधील आवाज वसंत मोरेंचा?
Vasant More Viral Audio Call Recording : या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे सातत्यानं चर्चेत आहे. आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वसंत मोरे आणि युपीतील मनसे कार्यकर्त्याची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याचा दावा केला जातो आहे. यामधील मनसे नेत्याचा आवाज हा वसंत मोरे यांचा असल्याचं बोललं जातंय. युपीतील एका मनसैनिकानं राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला युपीतून होणाऱ्या विरोधावरुन या कॉलमध्ये संभाषण झालंय. हा कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. इतकंच काय तर राज ठाकरेंच्या केसाला जरी हात लागला तरी इकडच्या यूपी बिहारींचे काय हाल होतील? असं म्हणत इशाराही देण्यात आलाय. राज ठाकरेंनी यूपीतल्या लोकांची माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांनी यूपीत येऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. यावरुन सध्या राजकारण तापलेलं असतानाच आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय.