“मुख्यमंत्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची कावीळ, एवढीच हिंमत असेल तर…”, ठाकरे गटाचं आव्हान
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. यावरून 'जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमालगोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल,' असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता.याला विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. यावरून ‘जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमालगोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल,’ असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता.याला विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं जातं”, असं विनायक राऊत म्हणाले. तसेच “आम्हाला जमालगोटा देण्याचं सोडा, ‘रत्नागिरीत शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची सभा झाली. या सभेतून लोक निघून गेले, त्यावर दृष्टी फिरवली, तर लोकांत आपलं स्थान किती, हे कळलं असतं,” असा टोमणा राऊतांनी लगावला आहे. वीर सावरकर जयंती निमित्त दिल्लीच्या महाराष्ट्र संसद भवनात कार्यक्रम घेतला यावरही विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीत सावरकरांची जयंती केली म्हणून, एकनाथ शिंदे मोठे भक्त झाले, असं नाही. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहे. हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींना भेटून सावरकरांना भारतरत्न जाहीर करण्यास सांगावं,” असं आव्हान विनायक राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं आहे.