‘विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष…,’ विजयानंतर काय म्हणाले विश्वजीत कदम
सांगलीत अपक्ष म्हणून लढणारे कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. या मतदार संघातील निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपाचे संजयकाका पाटील अशा तिघांमुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती.
सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. हा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाला होता. त्यामुळे येथून शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाने संजयकाका पाटील यांना तिकीट दिले होते. परंतू विशाल पाटील हे अखेर विजयी झाले आहेत. विशाल पाटील हे मविआसोबतच आहेत, ते केवळ तांत्रिकदृष्ट्या अपक्ष म्हणून लढल्याचे कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. विशाल पाटील यांना सांगलीतील जनतेने निवडून दिले आहे. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सांगलीची जनता आहे. परंतू मूळात सांगलीची जनता कॉंग्रेसच्या विचाराची असल्याचे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे. एखाद्या गोष्टीसाठी कष्ट घेतो तेव्हा यशाची अपेक्षा असते. आम्ही जिल्ह्यात कॉंग्रेसची मूठ बांधली होती. त्यामुळे कॉंग्रेसच्या हक्काची जागा आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा होती. या विजयाचे श्रेय सांगलीच्या जनतेला, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि वसंतदादा पाटील आणि पंतगराव कदम यांच्या विचारांना असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. महायुतीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता कंटाळली असल्याचे ते म्हणाले.