ईडी काय चहा प्यायला जात नाही…; नितेश राणे यांचा मुश्रीफांना टोला
ईडीने छापा टाकल्यानंतर याबाबत आपण माहिती घेऊन बोलू असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. तर सोमय्या हे एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती.
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजप नेते, माजी खासदार किरट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांचा नंबरही लागणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर आज ईडीचा छापा पडला आहे.
ईडीने छापा टाकल्यानंतर याबाबत आपण माहिती घेऊन बोलू असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. तर सोमय्या हे एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी केली होती. त्यावर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
यावेळी राणे यांनी टीका करताना, ईडी काही कुणाच्या घरी उगीच चहा प्यायला जात नाही. काही तरी कारणं असेलच. काही तरी त्यांच्याकडे माहिती मिळाली असेल त्यामुळेच त्यांच्याकडे चौकशी झाली असेल. काही भ्रष्टाचार झाला नसेल तर त्यात घाबरायची काय गरज आहे, आणि इतका थयथयाट करण्याची काय गरज आहे असे म्हटलं आहे.