मराठ्यांना का ? सर्वांनाच मोफत शिक्षण द्या, छगन भुजबळ यांची मागणी
मराठ्यांसाठी सरकारने सगेसोयरे बाबत अध्यादेश काढला नसून नोटीफिकेशनचा मसूदा काढला आहे. त्यावर 16 तारखेपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. मराठा नेते मनोज जरांगे प्रमाणे उद्या कोणीही लाखाचे मोर्चे काढून आमचा दलितात समावेश करा, आदिवासीत समावेश करा म्हणून मागणी करेल तर सरकार त्यांचे ऐकणार आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.
मुंबई | 27 जानेवारी 2024 : मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून पदयात्रा काढली होती. या आंदोलकांनी मुंबईत येण्याचा निर्धार व्यक्त केला होता. काल सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या होत्या. सगेसोयऱ्याबाबत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगे यांनी केली होती अन्यथा आम्ही आझाद मैदान गाठू असे म्हटले होते. काल रात्री सगेसोयरेबाबत अध्यादेश सरकारने काढला आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. जरांगे यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले. आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा अध्यादेश नसून नोटीफिकेशचा मसूदा आहे. यावर 16 तारखेपर्यंत हरकती मागविल्या आहेत. जरांगे यांनी मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी आहे. त्यावर मराठ्यांना मोफत शिक्षण का ? सर्वांनाच अगदी ब्राह्मणांनाही मोफत शिक्षण देण्यात यावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. यावर पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या सायंकाळी पाच वाजता त्यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.