उबाठाची जिरवण्यासाठी दक्षिण मुंबईत भाजपाची मनसेसोबत युती?, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
दक्षिण मुंबईची जागा भाजपा मनसेला देणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते अरविंद सावंत हे निवडणूक लढविणार आहेत. त्यांची मते खाण्यासाठी भाजपा दक्षिण मुंबई लोकसभेची जागा मनसेला देणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई | 14 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराची मते खाण्यासाठी भाजपाने दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्याचा प्लान आखल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. याबद्दल भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी आज तरी या विषयावर निर्णय झालेला नाही. या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू असल्याचे सांगितले आहे. तर आज या प्रकरणात अधिकृत मी काही सांगू शकणार नाही. चर्चा तर अनेक होत असतात. जर असा काही निर्णय झाला तर तुम्हाला कळविण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. तर या जागेवरुन शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले जात असताना त्यांचा पत्ता कट होणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी कोणाचा पत्ता कट करण्यासाठी असा निर्णय होत नसतो. राजकारणात काहीही घडू शकते असे म्हटले आहे. तर अन्य एक नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपा आणि शिवसेना तसेच मनसे हे एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचे सांगत ते भविष्यात एकत्र येऊ शकतात असे म्हटले आहे.