एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का?, चंद्रकांत पाटील म्हणतात….
एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे. मी अनेक नेत्यांना भेटत असतो असंही ते म्हणाले आहेत. आता यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरूच एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी देखील चर्चा सुरू झाली होती. याबाबत रक्षा खडसे यांनी खुलासा केला आहे. एकनाथ खडसे हे अमित शाह यांच्या भेटीला गेले होते, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र अमित शाह आणि खडसे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता या सर्व प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘खडसे यांनी मी भाजपात जाणार नसल्याचं म्हटलं आहे. मी अनेक नेत्यांच्या भेटी घेत असतो असंही खडसे यांनी म्हटलं आहे. ती त्यांची वैयक्तिक भेट असू शकते. मलाही या भेटीमुळे खडसे पुन्हा पार्टी बदलतात की काय असे वाटले होते, म्हणून मी तशी प्रतिक्रिया दिल्याचा’ खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.