राष्ट्रवादीची भाकरीच भाजपने पळवली; विरोधी पक्ष नेताच फुटला; राज्यात होणार दोन उपमुख्यमंत्री?
2019 मध्ये झालेला राजकीय भूकंप हा अर्धवट होता तो आता पुर्णत्वाकडे जात असल्याचं बोललं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता विरोधी पक्ष नेता अजित पवारच सामिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मविआचे छकले पडल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई : येत्या काही महिन्यांवर राज्यात लोकसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी लागण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाच्या मुहुर्तावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाला. 2019 मध्ये झालेला राजकीय भूकंप हा अर्धवट होता तो आता पुर्णत्वाकडे जात असल्याचं बोललं जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता विरोधी पक्ष नेता अजित पवारच सामिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मविआचे छकले पडल्याचे पहायला मिळत आहे. तर काही दिवसापासून रंगलेलं अजित पवार यांच्या नाराजी नाट्याचे रूपांतर हे सरकारमध्ये सामिल होण्यात झाले आहे. तर आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापुर्वी शिवसेना फोडली होती. त्यानंतर आता अजित पवार यांनी 30 एक आमदारांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच फोडली आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या फळितील सर्वच आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीसह राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.