माझ्या शेपटावर पाय देऊ नका, छगन भुजबळ यांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
येवला बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी प्रचाराऐवजी दराडे यांच्यावर आरोप करत जिल्हा बँक बुडवली असे विधान केले होते.
नाशिक : येवला बाजार समिती निवडणुकीला चांगलाच रंग चढताना दिसत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे एकमेकांच्या समोर उभे ठाठले आहेत. तर प्रचारात एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. येवला बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी प्रचाराऐवजी दराडे यांच्यावर आरोप करत जिल्हा बँक बुडवली असे विधान केले होते. त्याला आमदार नरेंद्र दराडे यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी दराडे यांनी, मी ओरीजनल शिवसैनीक आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसैनीक आहे. माझ्या शेपटावर पाय देऊ नका. उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. तर महाराज आम्ही जिल्हा बँक बुडवली नाही. तुम्ही बुडवली असा घणाघात केला आहे. त्याचबरोबर आर्मस्ट्राँग कंपनीसाठी भुजबळ यांना 15 कोटी रुपये कर्ज दिले होते. त्यातील त्यांनी आजपर्यंत तुम्ही एक रुपया देखील परतफेड केलेली नाही. तुमच्यावर 40 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्हा बँकेला तुमच्या सारख्या लोकांनी बुडवले.