महाराजांचा 100 फुटी भव्य पुतळा तयार होण्याआधीच तडे, निकृष्ट दर्जाचं काम की हलगर्जीपणा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागात असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची घटना ताजी असताना पिंपरी- चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल शंभर फुटी ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात येतोय, मात्र शिवरायांचा हा पुतळा उभारण्यापूर्वीच महाराजांच्या पायाला तडा गेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
पिंपरी- चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल शंभर फुटी ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात येतोय, मात्र तो उभारण्यापूर्वीच महाराजांच्या पायाला तडा गेल्याचा फोटो व्हायरल झालाय. या फोटोवरून सध्या उलट- सुलट चर्चा सुरु आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने जानेवारी २०२० ला छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली. यासाठी तब्बल ४७ कोटी खर्च केला जाणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हा पुतळा दिल्लीत साकारत आहेत. दिल्लीत पुतळ्याचे तयार झालेले काही पार्ट पिंपरीत दाखल झालेत. तर उर्वरित पार्ट येणं अद्याप बाकी आहे. हे सगळे पार्ट जोडून छत्रपती संभाजी महाराजांच्या शंभर फुटी पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे. यासाठी मोशीतील आंतराराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रालगतच्या जागेची अंतिम निवड करण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वीच पुतळ्याच्या पायाला तडा गेल्याचा फोटो व्हायरल झालाय, त्यामुळं हे काम निकृष्ट दर्जाचं आहे का? यात हलगर्जीपणा होतोय का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हेच प्रश्न पालिकेला विचारले असता, आत्ताच तसा निष्कर्ष काढणं चुकीचं राहील असा खुलासा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात पुतळ्याच्या उभारणीला २०२५ उजाडेल, अद्याप ही बरंच काम शिल्लक आहे. असं स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात येत आहे.