बैल बिथरला अन् नदीत पडला, मगरींच्या तावडीतून तब्बल चार तासांनंतर बैलाची सुटका, बघा व्हिडीओ
VIDEO | कृष्णा नदीच्या पात्रात बैलाचा आणि मगरीचा थरार... तब्बल चार तासाच्या धडपडीनंतर मगरीच्या तावडीतून बैलाची कशी झाली सुटका, बघा व्हिडीओ
सांगली : सांगलीच्या भिलवडी येथील कृष्णा नदी पात्रात बैल पडला आणि चार ते पाच मगरीच्या तावडीत सापडला. या बैलाची स्थानिक, नावाडी नितीन गुरव या युवकाने आपल्या मित्रांच्या मदतीने मगरीच्या तावडीतून तब्बल चार तासाच्या धडपडीनंतर सुटका केली. हा थरार कृष्ण नदीमध्ये नदीकडच्या सर्व ग्रामस्थांना पाहायला मिळाला. भिलवडीतील साठेनगर मधील अक्षय मोरे यांनी आटपाडी येथील बाजारातून तब्बल 70 हजार रुपयांचा देशी बैल खरेदी केला आणि टेम्पोतून त्याला येथे आणण्यात आले. गाडीतून खाली उतरत असताना ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून तो बिथरला आणि डावीकडून तो नदी काठाला पळाला.
यावेळी युवकांनी त्याला पकडण्यासाठी दोरीचा फास केला. मात्र तो फास चुकवून बैल हा नदीपात्रात पडला. बैल हा दुष्काळी भागातील असल्याने नदीचे पाणी पाहून तो सैरभैर झाला. पोहत तो पैलतीरावर अंकलखोपच्या दिशेने चालला. याच दरम्यान नदीपात्रात तीन-चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला. बैल मगरींना चकवा देत तो पोहत गेला. अखेर त्याने नदी काठ गाठला. यावेळी काही अंतरावर मगर फिरत होत्या. युवकांनी मदतीसाठी स्थानिक नावाडी नितीन गुरव यांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केले. तब्बल चार तासाने स्थानिक नावाडी नितीन गुरव यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने बैलाला बाहेर काढण्यात यश आले आहे.