महाराष्ट्रातील जनता पेटून उठलीये म्हणत, आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
VIDEO | कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला आदित्य ठाकरे यांचा इशारा
मुंबई : कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, कर्नाटकातील जनतने एकत्र येत गद्दार सरकारला पळवून लावले. 40 टक्के भ्रष्ट असलेल्या तिथल्या सरकारला पळवून लावलं. आपल्या महाराष्ट्रात तर बिल्डर-कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. त्यांना देखील निवडणूक येताच महाराष्ट्रातली जनता पळवून लावेल एवढी खात्री आहे. महाराष्ट्रातील जनता पेटून उठली आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. देशात आता बदलाचे वारे वाहत आहेत. मी परत परत सांगतोय तिकडच्या जनतेसारखं महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या सध्याच्या बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर सरकारला पळवून लावेल, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला आहे. रणांगण मावळाच्या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे बोलत होते. रणांगण मावळाची स्पर्धा ही अत्यंत चांगली झाल्याचे ते म्हणाले. मुलांना मजा येत आहे आणि त्यांना या कार्यक्रमातून इतिहास शिकायला मिळत आहे, महाराजांचा इतिहास लहान मुलं शिकत आहेत ही आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.