कसबापेठ, चिंचवडची पोटनिवडणूक होणारच; संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केल्यानंतर आणि राज ठाकरे यांनी पत्र लिहिल्यानंतरही संजय राऊतांना ठामपणे मांडली भूमिका
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं असलं तरी किंवा राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी देखील कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्टपणे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजूनही इच्छूक असूनआम्ही मविआ म्हणून ही निवडणूक लढवणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आवाहन चांगलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे. पण या राज्यात घाणेरडं राजकारण कोणी केलं? येथील वातावरण कोणी गढूळ केलं? महाराष्ट्रात सुडाचं राजकारण कोणी सुरू केलं? यावरही चिंतन व्हायला हवं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, राज्याच्या राजकारणात कटुता वाढली आहे. ती संपली पाहिजे. त्यासाठी ते पुढाकार घेणार होते. त्यांचं पाऊल का पुढे पडलं नाही. याबाबत संभ्रम आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.