निलेश राणे यांची ‘त्या’ निर्णयावरून माघार, पण कुणावर होती नाराजी?
tv9 marathi Special report | माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी तडकाफडकी राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र फडणवीसांच्या मध्यस्थीनं त्यांची नाराजी दूर झाली आहे आणि राजकारणातून निवृत्ती मागे घेतली.
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | राजकारणात मन रमत नाही म्हणत, निलेश राणेंनी राजकारणातून संन्यासाची घोषणा केली. मात्र फडणवीसांच्या मध्यस्थीनं त्यांची नाराजी दूर झाली आहे आणि राजकारणातून निवृत्ती मागे घेतली. पूर्वी प्रमाणेच निलेश राणे यांचा झंझावात दिसेल असं मंत्री रवींद्र चव्हाणांनी म्हटलं आहे. ट्विट करुन राजकीय संन्यासाची घोषणा केल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. निलेश राणे मंत्री रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याच्याही चर्चा रंगल्या. मात्र रवींद्र चव्हाणांनीच आधी निलेश राणेंच्या घरी जावून त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर निलेश राणेंना घेऊन रवींद्र चव्हाण फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आले. दीड तासांच्या चर्चेत फडणवीसांनी निलेश राणेंची समजूत काढली. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलेश राणेंच्या नाराजीचं कारण हे रवींद्र चव्हाणांच्या हस्तक्षेपासह प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून मिळालेली वागणूक आहे.