आज अजित पवारांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांना लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या 2100 रूपयांसंदर्भात आणि मविआ महिलांना देणार असलेल्या 3000 रूपयांसंदर्भात सवाल करण्यात आला. अजित पवार म्हणाले, मी विरोधकांचा जाहीरनामा पाहिला. मी अतिशय प्रांजळपणे आणि गंभीरपणे महाराष्ट्राला सांगतो, ही महाराष्ट्राची फसवेगिरी आहे. हा महाराष्ट्राला संभ्रमात टाकण्याचा डाव आहे. 3 हजार रुपये देणार. त्याबाबतीत आकडा जातो 90 हजार कोटी. थोडी संख्या वाढली तर 1 लाख कोटी रुपये तर इकडेच गेले. त्यांनी सुशिक्षितांकरता 4000 रुपये सांगितले, सुशिक्षित 1 कोटी म्हणटले तर ते 40 हजार कोटी ते झाले. ते झाल्यानंतर अजून काही माफी ती माफी अमूकतमूक काढली तर त्याला 50 हजार कोटी लागतील. सर्व त्यांच्या योजनांचा आकडा काढला तर हे कदापि शक्य नाही. ह्यांच्या हातात काहीच नाही. त्यांचं केंद्रात सरकार असतं तर केंद्राने कबूल केलं आहे, असं सांगू शकले असते. तुम्हाला लिमिटच्या बाहेर कर्जाला परवानगीच नाही. राज्याचा कारभार करत असताना आपण सगळ्यांनी आजपर्यंत आर्थिक शिस्त पाळण्याचा मनापासून प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांनी 600 रुपये वाढवण्याचं सांगितलं आहे. उद्या आम्ही केंद्र सरकारसोबत चर्चा करुन मदतीचं आवाहन करु शकतो. कारण केंद्राचं सरकार आमचं आहे. केंद्राने ठरवलं ते करु शकतो, असं अजित पवार म्हणाले.