Ajit Pawar : घोषणा नको, कृती झाली पाहिजे, अजून पंचनामे सुरू झाले नाही- विरोधी पक्षनेते अजित पवार
'मला यात राजकारण करायचं नाही. फक्त घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं,' असं आवाहन त्यांनी केलं.
नागपूर : अजित पवार (Ajit Pawar) हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी घोषणा नको, कृती झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मी ज्या दिवशी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांकडे (CM) काही दोन तीन प्रश्न मांडले. आम्हाला जे काही पाहायला मिळतं ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो. शेतकरी समस्या अडचणी, पंचनामे झाले नाहीत ते आम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊन त्यांना सांगतो. त्या भागातील खासदार (MP) आणि आमदार (MLA) जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना समस्या मांडत असतात, असं त्यांनी सांगितलं. ‘मला प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे सत्तेत असताना काय करायचं आणि विरोधात असताना काय करायचं हे मला माहीत आहे. मला यात राजकारण करायचं नाही. फक्त वरवर घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं,’ असं आवाहन त्यांनी केलं.