गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांमधील सूर जुळत नसल्याची चर्चा होतांना दिसत आहे. याबद्दल स्वतः अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला रोखठोक दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले, “प्रत्येक पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. त्यामुळे मागच्या वेळेस काही वक्तव्ये आली, ते माझ्याही कानावर पडले. मी त्यावर फार अडकून पडलो नाही. मी मुळातच अमित शाह आणि इतर महत्त्वाच्या नेतेमंडळींसोबत चर्चा करुन आलेलो असल्यामुळे माझं काम भलं आणि मी भलं अशी माझी भूमिका आहे. वरिष्ठांसोबत माझे संबंध चांगले आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र जात आहोत. कुठल्याही पक्षात काही वेगवेगळे मतप्रवाह असतात. मला त्यावर बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. पुढे ते असेही म्हणाले, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो. एकंदरीत ज्या पद्धतीने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार सुरु आहे. त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीकोनातून इथे आलो. त्यातून महाराष्ट्राचा सर्वांगिन विकास व्हावा, मतदारांचे आमदारांच्या मतदारसंघांमधील प्रश्न सुटावेत ही भावना घेऊन आलो असल्याचे दादा म्हणाले.