‘लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही’, मराठा समाजातील महिला अजित पवारांवर भडकली

| Updated on: Sep 22, 2024 | 3:30 PM

सोलापुरातील मोहोळ येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा दाखल झाली असताना काही मराठा आंदोलकांनी अजित पवार यांना विरोध दर्शवला. मराठा आंदोलकानी आक्रमक होत त्यांनी अजित पवार यांचा ताफा मोहोळमध्ये प्रवेश करताच अडवला. यावेळी आंदोलकांनी अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीदेखील केली.

Follow us on

‘अजित पवार आज मोहोळ येथे जनसन्मान यात्रेसाठी दाखल झाले आहेत. मात्र गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. याची या सरकारने दखल घेतली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सकल मराठा समाज भेटण्यासाठी थांबले असता पोलिसांनी अडवणूक केली. अजित पवार यांना मराठ्यांच्या मागणीचे एक निवेदन देण्यासाठी मराठा समाज थांबला आहे.’ अशी माहिती मराठा आंदोलकानं दिली यासह मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना त्यांची दखल न घेत अजित पवार जर गुलाबी कोट घालून या राज्यातून फिरणार असतील तर त्यांना आम्ही फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मराठा महिला आंदोलकदेखील अजित पवार यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले. लाडकी बहिण आरक्षणाची ओवाळणी मागत होती, पण अजित दादांनी लाडक्या बहिणीची दखल घेतली नसल्याचे या महिलेने सांगितले आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. बघा नेमकी काय व्यक्त केली नाराजी?