नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत महायुतीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आले होते. जवळपास दोन तास ही बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दरम्यान, बैठकीत नवाब मलिकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा भाजपच्या अनेक नेत्यांनी मलिकांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. इतकंच नाहीतर त्यांना विधानसभा निवडणुकीला उमेदवारी देऊ नये, असाही पवित्रा भाजपकडून घेण्यात आला होता. त्यानुसार नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवाब मलिक हे मानकूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. तर नवाब मलिकांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगर येथून तिकीट देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक नेत्यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. नवाब मलिक आणि सना मलिक या दोघांना एबी फॉर्म देण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. पण नवाब मलिक यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. यानंतर आता नवाब मलिक यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.