शरद पवार यांच्या बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दरवर्षी दिवाळी पाडव्याला कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवारांना भेटण्यासाठी येत असत. मात्र यंदा पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवा साजरा केले आहेत. एक अजित पवार यांचा काटेवाडीत आणि दुसरा शरद पवार यांचा पाडवा गोविंदबागेत… दरम्यान पहिल्यांदाच दोन वेगवेगळे पाडवा साजरा होत असताना अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दोन दिवाळी पाडवा आता इथून कायम राहणार आहेत. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण वेगळा पाडवा करायला पाहिजे. त्यानुसार अजितदादांनी हा निर्णय घेतला. आपण आता हे कायम करणार आहोत.’ पुढे ते असेही म्हणाले, एकत्र पाडवा केला असता तर जनतेत संभ्रम निर्माण झाला असता. दोन पक्ष आणि एकत्र येतात हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यांचा आणि आमचा पक्ष आता वेगळा आहे. त्यामुळे इथून पुढे हे दोन पाडवे साजरे होणार आहेत. आम्ही इथून पुढे पाडवा वेगळा करणार असलो तरी मात्र कुटूंब म्हणून आम्ही एकच आहोत. पण आता आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. ते कधी जुळणार नाहीत, असं सांगत असताना मी शरद पवार यांना भेटायला नेहमी जातो. यावेळी पण जाणार असल्याचे पार्थ पवार यांनी म्हटलं.