दादांचे कट्टर समर्थक शरद पवारांची तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्…

| Updated on: Sep 14, 2024 | 11:57 AM

अजित पवार यांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, गुरूवारी अनिल राक्षे यांनी अमोल कोल्हे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अनिल राक्षे आता शरद पवारांची तुतारी हाती घेण्याच्या चर्चांना तोंड फुटलंय.

अजित पवार यांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे शरद पवार यांची तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनिल राक्षे यांनी गुरूवारी अजित पवार यांच्या खेड दौऱ्याकडे पाठ फिरवून अमोल कोल्हेंची भेट घेतली. दरम्यान अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर राक्षे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. २०१४ पासून खेड आळंदी मतदारसंघातून अनिल राक्षे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र अजित पवारांनी खेडच्या दौऱ्यादरम्यान दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याने अनिल राक्षे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अनिल राक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तर त्यांच्या पत्नी रोहिणी राक्षे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. एकीकडे अजित पवार गटाचे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असताना भाजप नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेतली.

Published on: Sep 14, 2024 11:57 AM