Amravati : सुरक्षा कंत्राटदाराने महिलांना छळलं, मनसेने भर रस्त्यात चोपचोप चोपलं!
अमरावतीत एका रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणाऱ्या सुरक्षा कंत्राटदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात अडवून चांगलाच चोप दिला.
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले बघायला मिळाले. अमरावतीत एका रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणाऱ्या सुरक्षा कंत्राटदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात अडवून चांगलाच चोप दिला. यावेळी पीडित महिलाही घटनास्थळी होत्या. या महिलांनीदेखील सुरक्षा कंत्राटदाराला चांगलाच चोप दिला. महिला कर्मचाऱ्यांची छेड काढणाऱ्या नराधम कंत्राटदाराला आता चांगला धडा मिळाला, असं मत परिसरातील नागरिकांचं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमरावतीत रिम्स हॉस्पिटलने नव्याने सुरु झालं आहे. या हॉस्पिटलमधील सुरक्षा कंत्राटदाराच्या अनेक तक्रारी तेथील महिला कामगारांकडून ऐकायला येत होत्या. पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते.
ड्रेसच्या मोजमाप घेण्याच्या नावाखाली महिलांना स्पर्श करणे, विरोध करणाऱ्या महिलांनी तक्रार केली म्हणून कामावरुन काढून टाकणे आणि त्यांचा पगार आणि पीएफ सुद्धा न टाकणे असा प्रकार सुरु होता.
आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात
आरोपीने कामावरुन काढलेल्या महिलांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास भर रस्त्यात चोप दिला. मनसे पदाधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आरोपीला राजापेठ पोलिसांकडे सुपूर्द केला. यावेळी पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.