Special Report | एसटीच्या विलीनीकरणासंदर्भात अनिल परब मोठा निर्णय घेणार?
विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन दिवसात होणारी नाही. समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर निर्णय घेता येईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
मुंबई: एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्याशी चर्चा करायला सांगितलं आहे. मी महाधिवक्त्याशी चर्चा करेन. पण एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन करतानाच विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन दिवसात होणारी नाही. समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर निर्णय घेता येईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. आज एसटी संघटनेचे पदाधिकारी गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना परब यांनी हे आवाहन केलं. तुम्ही वकील आहात. तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया माहीत आहे. कोर्टाने जी समिती स्थापन केली. तिला पूर्ण अधिकार दिले आहे. अभ्यास करून अहवाल सादर करावा. कोर्टाने निर्णय दिलेले असताना त्यात फेरफार करता येणार नाही. समितीचा जो काही अहवाल असेल त्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं मी त्यांना सांगितलं, असं परब म्हणाले.