Special Report | जालन्यात लोकसभेची हवा, अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंना आव्हान देणार? -Tv9
जालनाः शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात भावी खासदार अशी टॅगलाईन असलेले बॅनर शहरभर झळकवले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईवरून अर्जुन खोतकर चर्चेत आले होते. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच ईडीचा ससेमिरा आपल्यामागे लागल्याचा आरोप खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमांमधून केला होता. तसंच आपण जालना लोकसभा लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या याच प्रतिक्रियेनंतर […]
जालनाः शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात भावी खासदार अशी टॅगलाईन असलेले बॅनर शहरभर झळकवले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईवरून अर्जुन खोतकर चर्चेत आले होते. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच ईडीचा ससेमिरा आपल्यामागे लागल्याचा आरोप खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमांमधून केला होता. तसंच आपण जालना लोकसभा लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या याच प्रतिक्रियेनंतर सध्या जालना शहरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी खासदार’चे अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो, अशा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
दानवे Vs खोतकर वाद उफाळणार!
शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष जुनाच आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने छापा मारला. या छाप्यामागे रावसाहेब दानवे असल्याचा आरोप खोतकर यांनी केला होता. त्यानंतर जाहीर कार्यक्रमांमध्ये दोघांचेही परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता शहरात अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर भावी खासदार, फिक्स, खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंविरुद्ध खोतकर यांनी दंड थोपटले होते. मात्र निवडणुकीत भाजप शिवसेना युती असल्यामुळे खूप मनधरणी केल्यानंतर खोतकर यांनी माघार घेतली होती. मात्र आता ईडीच्या कारवाईनंतर दानवेंविरुद्ध ते जाहीर कार्यक्रमांतून आरोप करत आहेत. त्यामुळे आगामी 2024 च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत पहायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.