‘लाडकी बहीण’ योजनेचं आशा भोसलेंकडून कौतुक; म्हणाल्या, ‘… तर मी 2 वेळेचं जेवले असते’
Asha bhosle on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा केले जात आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून गायिका आशा भोसले यांनी देखील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक केलं आहे.
राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने दर महिन्याला १५०० रूपये लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गांत आनंदाचं वातावरण असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहे. तर अशातच गायिका आशा भोसले यांनी देखील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचं कौतुक केलं आहे. ‘1947 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असती तर मी 2 वेळंचं जेवले असते’, असं वक्तव्य करत आशा भोसले यांनी या योजनेचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी झालेल्या अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात आशा भोसले यांनी योजनेचं कौतुक केलं आहे. ‘लाडक्या बहिणींना तुम्हा जे पंधराशे रुपये दिलेले आहेत, त्याची व्यथा आणि आनंत माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही. हे काम जर 1947 साली कोणी केलं असतं, पंधराशे रुपये मिळाले असते, तर मी दोन वेळेला जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं…. मी जेवण संभाळून ठेवणं शिकलं होतं कारण मी दुपारी जेवू शकत नव्हते कारण जेव्हा पती घरी यायचे तेव्हा दोघे मिळून आम्ही खायचो. तेवढंच जेवण माझ्याकडे होतं’, असं आशा भोसले म्हणाल्या.