मुंबईत पावसाचे धोकादायक चित्र निर्माण, मुख्यमंत्र्यांनी मनपासोबत बैठक घ्यावी : Ashish Shelar
भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरलं. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. गेली 25 वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या 25 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं. (ashish shelar)
भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरलं. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. गेली 25 वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या 25 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं, असं सांगतानाच या घटना म्हणजे मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर तर नाही ना? हे मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. (Ashish Shelar warn BMC and CM Uddhav Thackeray reagarding climate change in mumbai)
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर भाष्य केलं. मुबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडूपरच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरलं. 26 जुलैच्या पावसातही भांडूप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं नव्हतं. हे धोकादायक आहे, असं शेलार म्हणाले.
बदल धोकादायक
मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली 25 वर्षे काम करत आहे. माझ्या कार्यकाळात असं कधी पाहिलं नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत. या घटना म्हणजे मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांची बैठक बोलवा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांनी काल मुख्यमंत्र्यांना आढावा दिला आहे, असंही ते म्हणाले.
फ्लड वॉर्निंग कलानगरसाठीच
यावेळी त्यांनी पालिकेच्या फ्लड वॉर्निंग सिस्टिमवरही टीका केली. फ्लड वॉर्निंग सिस्टिम केवळ कलानगरसाठीच आहे. कलानगरला फ्लड वॉर्निंग आणि बाहेर फ्लड बेरिंग. कलानगरात खूप पंप लावले आहेत. शिवसेनेचे हेच धंदे आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सर्वेक्षण का केलं नाही?
राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने 112 टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही 31 लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात आणून ठेवायचं आहे. सेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली.
नरबळीचा प्रस्ताव आणणार का?
एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेत्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा संतप्त सवाल त्यांनी केला.
एसआयटी चौकशी करा
मिठी नदीवर फ्लड गेट लावण्यात येणार आहे. 185 ठिकाणी हे फ्लड गेट लावणार आहेत. मिठी नदीला फ्लड गेट लावणार आहात तर वरळीचे फ्लड गेट का काढले? इतर ठिकाणी लावलेल्या फ्लड गेटचा काय फायदा झाला? हा पालिकेचा नवा फ्लड गेट फ्रॉड आहे. मुख्यमंत्री संवेदनशीलपणे काम करत असतील. पण पालिकेत काय चाललं आहे? मुख्यमंत्र्यांनी एसआयटी मार्फत या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
संबंधित बातम्या
VIDEO | मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये 20 फूट पाणी, 400 वाहनं बुडाल्याची भीती
Mumbai Rains Live Updates | बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर पाणी, आता कल्याणपर्यंतच रेल्वे सेवा सुरू
(Ashish Shelar warn BMC and CM Uddhav Thackeray reagarding climate change in mumbai)