शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, ‘या’ 3 जणांची उमेदवारी फिक्स
निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीची नावे जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशा उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात सुरुवात झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना एबी फार्म देण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुंबईतून घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर राखी जाधव, पारनेर विधानसभेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आले आहे. आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रचार करता यावा यासाठी उमेदवारांना पक्षाकडून तत्काळ एबी फॉर्म देण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गट शिवसेनेकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहे, अशी माहिती मिळतेय. ठाकरे गट शिवसेनेकडून आजपासून एबी फॉर्म देण्यास सुरूवात झाली असून ज्या जागावर तिढा नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. राजापूर लांजा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी मातोश्रीमधून आपला एबी फॉर्म स्वीकारला आहे. यासोबतच कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांचा देखील एबी फॉर्म त्यांच्या प्रतिनिधीने स्वीकारला असल्याची माहिती मिळतेय.