Aurangabad | दोन दिवस उरले, लेबर कॉलनीवासीयांची धावाधाव, पालकमंत्र्यांनी भेट नाकारली, अखेर खासदार जलील अन् मंत्री कराड भेटले!
पालकमंत्री सुभाष देसाई यांना भेटून घरांवरील कारवाई टाळण्याची विनंती लेबर कॉलनीवासिय करणार होते. मात्र पालकमंत्र्यांनी ही भेट नाकारली. त्यानंतर संबंधित महिलांनी खासदार इम्तियाज जलील आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली आणि घरावरील संभाव्य कारवाई टाळण्याची विनंती केली.
औरंगाबादः शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जीर्ण झालेल्या लेबर कॉलनीतील (Labor colony) इमारती पाडण्याची कारवाई जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) येत्या 03 मे पर्यंत येथील रहिवाशांना घरे खाली करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र ही घरे वाचवण्यासाठी लेबर कॉलनीतील महिला आज आक्रमक झालेल्या दिसल्या. येथील तीन ते साडेतीन हजार घरे खाली करण्याच्या आदेशाविरोधात कामागारांच्या कुटुंबातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (District collector office) धाव घेतली. महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आहेत. यानिमित्ताने त्यांना निवेदन देण्यासाठी लेबर कॉलनीवासीय जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांची भेट नाकारली आणि ते तेथून रवाना झाले.
Published on: May 01, 2022 05:37 PM